जनता इंग्लिश स्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत

जनता इंग्लिश स्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत
दिंडोरी : (संतोष कथार)
जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, दिंडोरी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता ५ वी ते ८ वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सव कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव बालविकास शालेय समितीचे अध्यक्ष दौलतराव उखर्डे, दिंडोरी तालुका माजी सैनिक परिवार संघाचे संस्थापक अध्यक्ष मेजर भारत खांदवे, ज्येष्ठ सदस्य गणपतराव जाधव, सुभाष बोरस्ते, प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसठ, पर्यवेक्षक डी. के. टोपले, आर. एस. शिंदे, टी. जी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने पालकांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांना ढोल-ताशांच्या गजरात प्रवेशद्वारापासून मंचापर्यंत मिरवणुकीने आणण्यात आले. विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. साधना पेलमहाले यांनी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सरस्वती पूजन करण्यात आले.
महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. प्राचार्य शरद शेजवळ यांनी प्रास्ताविकातून विद्यालयात राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम, गुणवत्तावृद्धीसाठीचे प्रयत्न तसेच विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
मेजर भारत खांदवे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गीतही ऐकविले.
प्रवेशोत्सवानिमित्त शिक्षकांनी फुगे, आकर्षक रांगोळी, फलकलेखन व सजावटीद्वारे विद्यालय परिसर उत्साहपूर्ण आणि आनंदमय बनविला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सौ. नेहा देशमुख यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top