जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह’ नाव द्या!
शिक्षणमंत्री दादा भुसे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रवीण नाना जाधव यांची मागणी
नाशिक :
नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या इतिहासात कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासह शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य नाशिकच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील अमूल्य वारसा आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील प्रमुख सभागृहाला ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह’ हेच नाव देण्यात यावे, अशी जोरदार मागणी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तथा मविप्र समाजाचे संचालक प्रवीण एकनाथ (नाना) जाधव यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात प्रवीण नाना जाधव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना रजिस्टरद्वारे निवेदन पाठविले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
जुन्या नामपरंपरेला नव्या इमारतीतही सन्मान द्या
निवेदनात म्हटले आहे की, कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील सामान्य जनतेपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधण्यासाठी आयुष्यभर महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आणि ग्रामीण समाजाच्या विकासाला दिशा मिळाली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा ठसा नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक इतिहासावर कायमस्वरूपी उमटलेला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या पूर्वीच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह’ असे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. आता जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. मात्र इमारत बदलली म्हणून इतिहास आणि नामपरंपरा बदलण्याचे कारण नाही. उलट पूर्वीपासून जपलेली ही ऐतिहासिक नामपरंपरा नव्या इमारतीतही कायम ठेवणे हीच कर्मवीरांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल, अशी भूमिका प्रवीण नाना जाधव यांनी मांडली आहे.
नवीन नामकरण नव्हे; ऐतिहासिक परंपरेचा सन्मान
नवीन प्रशासकीय इमारतीतील प्रमुख सभागृहाला पुन्हा ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह’ हेच नाव देणे म्हणजे नवीन नामकरण करण्याचा विषय नसून, जिल्हा परिषदेने पूर्वीपासून जपलेल्या ऐतिहासिक नामपरंपरेला पुढे नेण्याचा निर्णय आहे.
जिल्हा परिषद ही ग्रामीण शिक्षण, आरोग्य, विकास आणि लोककल्याणाशी थेट जोडलेली लोकाभिमुख संस्था आहे. अशा संस्थेच्या प्रमुख सभागृहाला शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव असणे हे पूर्णतः सार्थ व उचित आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सभागृहातून होणाऱ्या प्रत्येक निर्णयाला कर्मवीरांची प्रेरणा मिळावी
नवीन प्रशासकीय इमारतीतील या प्रमुख सभागृहात जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण बैठका, प्रशासकीय निर्णय आणि धोरणात्मक चर्चा होणार आहेत. शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य, लोककल्याण आणि प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय या सभागृहातून घेतले जाणार आहेत.
या सभागृहाला कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याची ओळख केवळ इतिहासापुरती मर्यादित न राहता प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्यांच्या कार्याची प्रेरणा पोहोचेल, असा विश्वास प्रवीण नाना जाधव यांनी व्यक्त केला.
‘ही राजकीय मागणी नाही; नाशिकच्या इतिहासाचा सन्मान आहे!’
ही मागणी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून नाशिकच्या शैक्षणिक व सामाजिक इतिहासाचा सन्मान करण्यासाठीची मागणी आहे, असे स्पष्ट करत प्रवीण नाना जाधव म्हणाले की, कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे कार्य कोणत्याही एका पक्षाचे, गटाचे किंवा संघटनेचे नाही. ते संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक वारशाचा अविभाज्य भाग आहे.
“इमारत नवी, पण इतिहास तोच; म्हणून सभागृहाचे नावही तेच!” या भूमिकेतून नवीन प्रशासकीय इमारतीतील प्रमुख सभागृहाला ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह’ असे नाव देण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चौकट : ‘नाशिक हा कर्मवीरांचा जिल्हा; सर्वपक्षीयांनी पुढाकार घ्यावा!’
नाशिक जिल्हा हा कर्मवीरांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे मोठे योगदान आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या पूर्वीच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला आधीपासूनच कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याच जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील प्रमुख सभागृहाला कर्मवीरांचे नाव देणे ही कोणतीही नवीन किंवा अवघड मागणी नसून, पूर्वीच्या गौरवशाली परंपरेचा स्वाभाविक आणि योग्य विस्तार आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय विद्यमान आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सर्व पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या मागणीसाठी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तथा मविप्र समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले आहे.
कर्मवीरांच्या नावाला कोणत्याही राजकीय रंगाची गरज नाही; त्यांच्या कार्याचा सन्मान हीच नाशिकची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली नाही, तर नाशिक जिल्ह्यात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रवीण नाना जाधव यांनी दिला आहे.

